हिमंता सरमांकडून पत्नीच्या कंपनीला 10 कोटींची सबसिडी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या पत्नीच्या कंपनीला मदत करण्यासाठी केंद्र सरकारची तब्बल 10 कोटी रुपयांची सबसिडी मिळवून दिली, असा आरोप काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी बुधवारी केला. या प्रकरणी पुराव्यादाखल गोगोई यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून कागदपत्रेही शेअर केली असून हीच का भाजपाला श्रीमंत बनवण्याची सरकारची स्कीम, असा सवालही केला आहे.  दरम्यान, सरमा यांनी गोगोई यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.

गौरव गोगोई यांनी  सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुईया सरमा यांच्या प्राईड इस्ट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 10 कोटींची सबसीडी देण्यात आल्याचा पुरावा अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या दस्तावेजाच्या माध्यमातून एक्सवरून शेअर केला आहे. जर अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक झाले असेल तर या प्रकरणी भाजपा नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांना कळवायला हवे, असा टोलाही लगावला आहे.

हिमंता सरमा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले असून पत्नी आणि पत्नीच्या कंपनीला केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळाली नसल्याचा दावा केला आहे.

भाजपाचे करप्शन मॉडेल

भुईया सरमा या शेतजमीन खरेदी करून त्याचे रुपांतर औद्योगिक वापरासाठीच्या जमिनीत करत होत्या. त्यानंतर त्याच जमिनीवर पंतप्रधान किसान योजने अंतर्गत सरकारकडून 10 कोटींचे अनुदान घेतले. हेच भाजपाचे करप्शन मॉडेल असल्याचा आरोपही काँग्रेसकडून एक्सद्वारे करण्यात आला आहे.

काँग्रेसचे तीन प्रश्न

  1. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पत्नी संचालक असलेल्या शेतकऱयांच्या हक्काचे 10 कोटी अनुदान दिले जाते. शेतकऱयांचे पैसे डबल करण्याचे हेच ते मॉडेल आहे का?
  2. शेतकरी शेतीतून रोज 27 रुपये कमवातोय. दुसरीकडे किसान संपदा योजने अंतर्गत 10 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते, अशी सुविधा देशातील इतर लोकांना कधी मिळेल?
  3. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’चे हेच का ते मॉडेल?