Pune porsche hit and run case: पोलिसांकडून 150 सीसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी; अगरवाल कुटुंबाच्या अडचणी वाढणार

बेदरकारपणे आलिशान मोटार चालवीत अल्पवयीनाने दोघा अभियंत्यांचा जीव घेतल्याची घटना 19 मे रोजी कल्याणीनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाईला आता गती दिली असून आरोपींचे घर, अपघातस्थळ, पब-बार, हॉटेलमधील तब्बल 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. त्याद्वारे तपास करून यामध्ये समाविष्ट असलेल्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी उघडकीस येणार असल्यामुळे अगरवाल कुटुंबीयांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर अपघाताच्या अनुषंगाने नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. आतापर्यंत गुन्हे शाखेने अग्रवाल कुटुंबीयांचे घर, अल्पवयीन आरोपीने मद्यपान केलेला बार, अपघात घटनास्थळासह आरोपीने केलेल्या प्रवासादरम्यानचे तब्बल 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याअनुषंगाने आता फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून, याप्रकरणी आणखी सखोल खुलासा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 25) आरोपी विशाल अग्रवालच्या बंगल्यात छापेमारी केली होती. तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, घटनेच्या दिवसापासून ते अग्रवाल कुटुंबीयाने त्यांच्याच चालकाचे केलेल्या अपहरणाची कुंडली बाहेर येणार आहे.

दरम्यान, सध्या अल्पवयीन बालसुधारगृहात असून, त्याचे वडील विशाल अगरवाल न्यायालयीन कोठडीत, तर आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल हे अटकेत आहेत.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलाने अपघात केल्यानंतर बिल्डर विशाल अगरवालने काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने त्याने गाडी मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवीत असल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले होते, तर आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांनीही गाडी चालकाला बंगल्यावर बोलावून घेतले. त्याला विविध आमिष दाखवून अपघात केल्याचा गुन्हा अंगावर घेण्यास सांगितले. त्यासाठी वाटेल ती पिंमत देण्याची तयारी अगरवाल कुटुंबीयांनी दाखविली होती, मात्र संबंधित चालकाने गुन्हा अंगावर घेणार नसल्याचे सांगितले. त्याच रागातून अगरवाल कुटुंबीयाने त्याचे अपहरण करीत डांबून ठेवले. याप्रकरणी सुरेंद्र अगरवाल याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त, एसीपींवर वरदहस्त कशासाठी?

कल्याणीनगर अपघातप्रकरणी वरिष्ठांना वेळेत माहिती न देणे आणि तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा ठाण्यातील दोन अधिकाऱयांना निलंबित केले आहे. प्रत्यक्षात मात्र घटनेच्या दिवशी रात्रपाळीला ऑनडय़ुटी असलेले पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक उपायुक्तांची काहीच जबाबदारी नव्हती का? पोलीस अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करीत वरिष्ठांनी पुन्हा एकदा बळीचा बकरा केल्याची चर्चा पुणे पोलीस दलात रंगली आहे.
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या दोघांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी (दि. 19) मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये घडली. अपघाताची माहिती वरिष्ठांना न दिल्याबद्दल आणि या घटनेचा गांभीर्यपूर्ण तपास न केल्याचा ठपका ठेवत येरवडा ठाण्यातील निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षकाला निलंबित केले. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले. दरम्यान, त्या दिवशी रात्रपाळीला असलेले पोलीस उपायुक्त यांच्यासह इतर अधिकाऱयांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील घटनांची नेमकी कोणती माहिती घेतली? नाईट राऊंड, अधिकाऱयांची डय़ुटी संपण्यापूर्वी अपघाताचे व्हिडीओ आणि पह्टोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तरीही एवढय़ा गंभीर अपघाताची पुसटशीही कल्पना संबंधितांना का आली नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

पुणे पोलिसांचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर

भयंकर अपघात घडूनही प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या अधिकाऱयांनी वरिष्ठांसह पंट्रोल रूमला माहिती दिली नाही. त्यामुळे रात्रपाळीच्या अधिकाऱयांना याबाबत काहीच समजले नाही, असा निष्कर्ष काढून आता चौकशी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र पुणे पोलिसांना कोणत्याही घटनेचे गांभीर्य कधी येणार आहे. विशेषत: काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती सदाशिवपेठेत कोयत्याधारी तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर केलेल्या जीवघेण्या हल्लावेळी चौकीत पोलीस नसणे, अपघातात दोघा अभियंत्याचा जीव गेल्यानंतरही किरकोळ घटनेप्रमाणे वागणे, अशा अनागोंदी कारभारामुळे पुणे पोलिसांची नागरिकांमधील इभ्रत ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे.

एक्साईजकडून 14 पबवर कारवाई

कल्याणीनगर भागातील ‘बॉलर’ पबसह शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने शहराच्या विविध भागातील 14 पब, बारवर कारवाईचा बडगा उगारला. या पद्धतीने गेल्या आठवडय़ाभरात 54 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई केल्याने शनिवारी मध्यरात्री या भागात शुकशुकाट पाहायला मिळाला.

कल्याणीनगर भागातील ‘हिट अॅण्ड रन’ घटनेत संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता शहर परिसरातील पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली. शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत काwसडीकर आणि त्यांच्या पथकाने कल्याणीनगर, मुंढवा भागातील 14 पब, बारवर कारवाई केली. मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलर पबवर कारवाई करून त्याला टाळे ठोकण्यात आले आहे.

मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टोरंट आणि रूफ हॉटेल्सविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आठवडभरात 54 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
– चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

महापालिकेसमोर तरुण-तरुणींचे आंदोलन

कल्याणीनगरमधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात बळी पडलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी महापालिका भवनासमोर तरुण- तरुणींसह नागरिकांनी एकत्रित येत मोठय़ा प्रमाणात आंदोलन केले. पीडितांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारने एक कुशल आणि उच्चस्तरीय सरकारी वकील नेमला पाहिजे ज्यावर या प्रभावशाली आरोपींचा दबाव येणार नाही तसेच या भीषण घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अश्विनी आणि अनिश यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अश्विनी आणि अनिश हे दोघे 24 वर्षांचे होते. पुण्यात आयटी इंजिनीअर म्हणून काम करत होते.