नाशिकमध्ये सराफाकडे सापडले 26 कोटींचे घबाड, शंभर कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत

नाशिकमधील सराफी व्यावसायिक व त्याच्या भागिदारावर गुरुवारी सायंकाळपासून आयकरचे धाडसत्र सुरू होते. तब्बल तीस तासांहून अधिक काळानंतर शनिवारी रात्री ही कारवाई पूर्ण झाली. यात 26 कोटींची रोकड आणि सुमारे शंभर कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.

नाशिकमधील प्रसिद्ध ज्वेलर्सचे पॅनडा कॉर्नर येथील दुकान, राका कॉलनीतील बंगला, भागिदाराचे पंचवटी येथील निवासस्थान, तसेच कर्मचाऱयांच्या घरी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून आयकर विभागाचे धाडसत्र सुरू होते. नाशिक, नागपूर, जळगाव येथील पन्नासहून अधिक अधिकारी, कर्मचाऱयांकडून ही कारवाई सुरू होती. ज्वेलर्सचे निवासस्थान व कार्यालयातील फर्निचरमध्ये, तसेच कर्मचाऱयांच्या घरी रोकड लपवून ठेवण्यात आली होती. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संपूर्ण मोजदाद पूर्ण झाली. दरम्यान, या कारवाईने पुन्हा एकदा नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि अन्य बडे करचुकव्यांचे धाबे दणाणले आहे.