तीन राज्यांत 45 घरफोडय़ा, सराईत गुन्हेगाराला अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

सिंधुदुर्ग जिह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात तब्बल 45 घरफोडय़ा करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कणकवली तालुक्यातील वागदे येथून ताब्यात घेतले आहे. प्रकाश विनायक पाटील (37) रा. घाटवाडा, पडोसे सत्तरी नॉर्थ गोवा असे त्या संशयितचे नाव असून त्याच्याकडून 30 लाख 48 हजार 784 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा त्याच्याकडील कार नं. जीए- 05 एफ 4601 ने प्रवास करताना मिळून आला. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरी केलेलं पैसे व दागिने आणि हत्यारे आढळून आली.

प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध सिंधुदुर्ग जिह्यामध्ये 8 गुन्हे, कोल्हापूर जिह्यामध्ये 9 गुन्हे, गोवा राज्यात 4, कर्नाटक राज्यात 24 असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुह्यांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे. या संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.

30 लाख 48 हजार 784चा मुद्देमाल जप्त

कणकवली तालुक्यातील वागदे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून 1 गावठी कट्ठा, 3 जिवंत राऊंड, 1 काडतूस बंदूक, 27 जिवंत काडतूसे, 5 तलवारी, 4 लाख 69 हजार 950 रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, 11 विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट, 166 ग्रॅम 16 मिली वजनाचे 9 लाख 68 हजार 490 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने, 3 लाख 35 हजार 844 रुपये किंमत असलेले 5 किलो 300 ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने, पैसे मोजण्याची ईलेक्ट्रिक मशिन, सोने चांदी वितळविण्याची इलेक्ट्रिक मशिन, 3 ड्रिल मशिन, एक दुचाकी व एक चार चाकी वाहन असा एकूण 30 लखा 48 हजार 784 रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.