चीनमध्ये चक्रीवादळाचा हाहाकार, 5 ठार 33 जखमी

चीनमध्ये सध्या चक्रीवादळ आणि पावसामुळे हाहाकार उडाला आहे. यादरम्यान 5 जण ठार तर 33 जण जखमी झाले. या वादळाचा सर्वाधिक फटका ग्वांगझू शहरासह परिसरात बसला आहे. या भागात वादळी वार्‍यांसह मुसळधार पावासाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे वार्‍यांचा वेग 20.6 मीटर प्रतीसेंकद नोंद झाली आहे.

चीनमध्ये सुरु असलेल्या या वादळामुळे अनेक घरे, वीजेचे खांब जमीनदोस्त झाले. तूफान वादळामुळे 141 कारखान्यांच्या बांधकामांचे मोठे नुकसान झाले. मदत व बचाव पथकाने ताबडतोब पथके तैनात करून मदतीचे अभियान पूर्ण केले. गेल्या वर्षीही चीनच्या ग्वांगझू शहरात भीषण वादळात 10 जणांचा मृत्यू झाला होता. टायफून हायकुई नावाच्या या वादळाने ग्वांगझूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हाँगकाँगपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले ग्वांगझू शहर हे ग्वांगडोंग प्रांताची राजधानी आहे. हे चीनचे औद्योगिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या भागात अनेक कारखाने आहेत, जे मोठ्या प्रमाणात चीनी मालाची निर्यात करतात. ग्वांगडोंग प्रांत काही काळापासून हवामानाचा तडाखा सहन करत आहे. आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चीनच्या हवामान खात्याने महिनाअखेरीस मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे.