मेरठमध्ये हाय टेंशन लाइनच्या धक्क्यामुळे 5 कावड्यांच्या मृत्यू, 16 जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कावड यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. कावड यात्रेमध्ये चालणाऱ्या 5 कावड्यांचा हाय टेंशन लाइन मधून जाणाऱ्या विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे.

या घटनेनंतर संतप्त कावड्यांनी घटनास्थळी चक्का जाम करून गोंधळ घातला आहे. यामुळे पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. ही घटना भावनापूर पोलीस ठाण्याच्या रली चौहान भागात घडली आहे. जिथे डीजे कावड हरिद्वारहून पाणी घेऊन मेरठला पोहोचत होते. गावात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी हाय टेंशन लाईनमधील विद्युत प्रवाह थांबवण्यास सांगितले. मात्र दुर्लक्ष केल्यामुळे हाय टेन्शन लाईन सुरुच राहिली आणि डीजे कावड हाय टेन्शन लाईनला धडकली. यामुळे कावड्यांना विजेचा धक्का लागला व 5 कावड्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.