गुजरातच्या नवसारी येथे बस आणि कारच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. नवसारी येथील वेस्मा गावाजवळ कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेस्मा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. बस वलसाड येथे जात होती, यावेळी विरुद्ध दिशेने एक एसयूव्ही कार येत होती. यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक तसेच एसयूव्हीमधील नऊ जणांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. एसयूव्हीमध्ये प्रवास करणारे लोक गुजरातमधील अंकलेश्वर येथील रहिवासी होते. हे सर्वजण वलसाडहून आपल्या गावी परतत होते.

अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग 48 वर झालेल्या या अपघातानंतर येथे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. यावेळी क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला हटवून रस्ता खुला करण्यात आला.