
बांगलादेशचे मावळते मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. देशांतर्गत पातळीवर लोकशाही प्रस्थापित करण्यात आणि हिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यात आलेल्या अपयशावरून टीका होत असताना, युनूस यांनी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील ‘Seven Sisters’ राज्यांचा उल्लेख करत वाद ओढवून घेतला आहे.
शेख हसीना यांच्या सत्तेनंतर जुलै २०२४ मध्ये झालेल्या उठावानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने कार्यभार स्वीकारला होता. मात्र, १८ महिन्यांच्या कार्यकाळात हिंदूंवर झालेले हल्ले आणि कायदा-सुव्यवस्थेचा ढासळलेला बुरुज यावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली.
हिंदुस्थानविरोधी सूर
आपल्या भाषणात युनूस यांनी ‘बांगलादेशने आता आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा मिळवली असून आम्ही आता कोणाच्याही इशाऱ्यावर चालणार नाही,’ असे विधान केले. त्यांचा हा रोख थेट हिंदुस्थानच्या दिशेने असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, नेपाळ आणि भूतानप्रमाणेच त्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांचा (Seven Sisters) उल्लेख स्वतंत्र आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात केला. हिंदुस्थानच्या अविभाज्य भागाचा अशा प्रकारे उल्लेख करणे, हे दिल्लीला चिथावणी देणारे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
चीनशी जवळीक आणि लष्करी सज्जता
युनूस यांनी आपल्या भाषणात चीनसोबत वाढणाऱ्या मैत्रीचेही समर्थन केले. हिंदुस्थानसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर जवळच्या ‘तिस्ता नदी प्रकल्पा’साठी चीनचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. तसेच, ‘कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी’ बांगलादेश आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करत असल्याचे सांगत त्यांनी हिंदुस्थानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत मौन
देशांतर्गत प्रश्नांवर मात्र युनूस यांनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यांच्या कार्यकाळात हिंदूंची मंदिरे पाडली गेली, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आणि कट्टरपंथीयांनी दहशत माजवली. या गंभीर मुद्द्यांवर खेद व्यक्त करण्याऐवजी त्यांनी आपले भाषण परराष्ट्र धोरणाच्या फुशारक्या मारण्यापुरतेच मर्यादित ठेवले.
नोबेल विजेते युनूस यांनी आपल्या १८ महिन्यांच्या कार्यकाळातील अपयशावर पांघरुण घालण्यासाठी भू-राजकीय वादाचा आधार घेतल्याची टीका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.
muhammad yunus mentions indias seven sisters in farewell speech | bangladesh
outgoing bangladesh chief adviser muhammad yunus sparks controversy by mentioning indias northeastern states and deepening ties with china in his exit speech.

























































