
कलरसाठी लागणारे रेसिन नावाचे केमिकल बनवणाऱ्या ओर्सन रेसिन्स अँड कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादन वाढीचा घाट घातला आहे. 700 टनाचे उत्पादन घेणाऱ्या या कंपनीच्या प्रदूषणामुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असताना आता 7 हजार टन उत्पादन वाढवण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर बनल्याने या विस्तारिकरणाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षदेखील आक्रमक झाला असून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा पालघर जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी दिला आहे.
वाड्यातील दिनकरपाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून ओर्सन रेसिन्स अँड कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीत रेसिन नावाचे केमिकल बनवले जाते. हे केमिकल कलरमध्ये वापरले जाते. मात्र या कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना श्वसन, घसा खवखवणे आणि खोकला असे आजार जडले आहेत. तसेच कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे अनेकांच्या शेती नापिक झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांचे हात वर
संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांची भेट घेऊन समस्यांविषयी चर्चा केली. या घटनेची गंभीर दखल घेऊन चार दिवसांपूर्वी कंपनी प्रशासनाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गावकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कुठे दुर्गंधी आहे, आम्हाला तर वासच येत नाही असे सांगून हात वर केले. कंपनीच्या 7 हजार टन उत्पादन वाढीला प्रशासनाने परवानगी न देण्याची मागणी संतप्त महिलांनी केली आहे. कंपनीला उत्पादन वाढवण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा जिल्हाप्रमुख पाटील यांनी दिला आहे.




























































