
खारेगाव टोलनाक्याजवळ आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात कारचालकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे काही काळ मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
पहाटे 4 च्या सुमारास नायरा पेट्रोल पंपाजवळ, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर कारचालक दीपक पाटेकर (26) यांचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरात मागून धडकली. या धडकेत चालक पाटेकर कारमध्ये अडकून पडला होता. ठाणे महापालिका अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याला बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले; मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अपघातात सुजय पाटील (20), राज चिले (22) व सुगम जयस्वाल (24) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्नेहल भुसेकर या तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































