
येत्या 19 एप्रिलपासुन चारधाम यात्रा सुरू होणार आहे. याकरता उत्तराखंड प्रशासन यात्रेकरूंच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी सज्ज झाले आहे. यात्रेकरूंच्या सोयी आणि सुरक्षेसाठी १२७ पार्किंग स्थळे, ४७ विश्रामगृहे, ५७ आरोग्य तपासणी केंद्रे आणि १७७ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच, यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी २१ ठिकाणी ३६ एपीएनआर कॅमेरे, १२९० सीसी कॅमेरे आणि हेलिकॉप्टर यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी २७ पीटीझेड कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
दैनिक जागरण ने दिलेल्या वृत्तानुसार, आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, यात्रेकरूंच्या आरोग्य तपासणीसाठी यात्रा मार्गावर ५७ तपासणी केंद्रे आणि वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबरीने आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी १७७ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात्रा मार्गावर दहशतवादविरोधी पथके, बॉम्ब निकामी करणारी पथके आणि जलद प्रतिसाद दले तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, ड्रोन आणि सीसीटीव्ही पाळत ठेवून संवेदनशील ठिकाणांवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.
उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ आणि कौशल्य विकास विभागाने गुरुवारी यात्रेसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शक, हमाल, चालक आणि आतिथ्य कर्मचाऱ्यांसाठी किमान क्षमता मानके निश्चित करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले.




























































