
60 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत ठाण्याचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा रंगतदार लढतीत 19-23, 25-10 व 25-6 असा पराभव करून बाजी मारली. महिलांच्या गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने पालघरच्या श्रुती सोनावणेचा 21-6, 25-9 असा सहज पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.
तसेच तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जळगावच्या संदीप दिवेने मुंबईच्या सौरभ मतेवर 23-1, 25-9 असा विजय मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. महिलांच्या गटाच्या तिसऱया क्रमांकाची लढत मुंबईच्या नीलम घोडकेने ऐशा खानवर 25-6, 25-14 अशी मात केली.
वयस्कर पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या संजय थिटेने मुंबईच्या सत्यनारायण दोंतुल्लाचा 20-19, 25-13 असा पराभव करून जेतेपद मिळवले. वयस्कर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या शोभा कामतने आठवे राज्य विजेतेपद पटकावताना उपनगरच्या माधुरी तायशेटेचा पराभव केला.




























































