मुंबईला अमली पदार्थांचा विळखा, गृह विभागाला आली जाग; सोमवारी सरकारने बोलावली बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज सेवनानंतर अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमली पदार्थ पदार्थांच्या विक्रेत्यांचा शोध घेऊन कडक कारवाई व ‘झीरो टॉलरन्स’ भूमिका घेण्याच्या दृष्टीने 20 एप्रिलला राज्य सरकारने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात 4 वाजता बैठक आयोजित केली आहे.

गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने जाग आलेल्या राज्य सरकारने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आशीष शेलार, सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क व महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. मुंबईत ड्रग्ज विक्रीच्या मागे समाजविघातक शक्ती अशा घटनांना जबाबदार असल्याची शक्यता आहे. यादृष्टीने पोलिसांनी तपास करण्याचा मुद्दा यावेळी चर्चेला येणार असल्याचे या बैठकीचे आयोजक मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांना सांगितले.