
चिरनेर ते गव्हाण फाटा मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पाच हजार उरणवासीयांची वाहतूककोंडी फुटली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. मात्र पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उरण पूर्व भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला जुना पूल तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. त्याच जागेवर मध्य रेल्वेने तातडीने रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. मात्र हे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले. आज या पुलाचे गव्हाण फाटा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजाराम मांढरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे विभागाच्या डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर विभागाचे सहाय्यक अभियंता राघवेंद्र श्रीवास्तव, टीआयपीएल अभियंता सतीश उगले, क्षितिज पांडे, आनंद मोर्या, प्रताप साहू, संदीप बोर्डे व आर. जी. ठाकूर, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस रुपेश दराडे आदी उपस्थित होते.
हा पूल वाहतुकीस खुला झाल्यामुळे पाच हजार प्रवासी व वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून होणारी गैरसोय दूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
उरण पूर्व विभागातील चिरनेर, आवरे, केळवणे, खोपटा मार्गांवर एसटी प्रवास सुरू होणार आहे. रिक्षा व अन्य वाहनांतून नागरिकांना पनवेल, मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथे विनाअडथळा जाता येणार आहे.
पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास सुखकर व सोपा बनला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुना पूल पाडल्यानंतर वाहनचालक आणि प्रवाशांना एक किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. मात्र आता नवीन बांधलेल्या पुलाचे उद्घाटन झाल्याने वाहतूक पोलिसांवरील ताणही कमी झाला आहे.
























































