हिंदुस्थानची शूटआऊटमध्ये बाजी! अर्जेंटिनाला मालिकेत बरोबरीत रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने अर्जेंटिनाविरुद्धच्या चार सामन्यांच्या दौऱ्याचा शेवट २-२ अशा बरोबरीत केला. अखेरचे दोन सामने जिंकत हिंदुस्थानी संघाने दौऱ्याची सकारात्मक सांगता केली. शूटआऊटपर्यंत रंगलेला चौथा सामना ३-२ गोल फरकाने जिंकून हिंदुस्थानी महिलांनी मालिकेत बरोबरी साधली.

या दौऱ्याची सुरुवात १३ एप्रिलला पहिल्या सामन्याने झाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत नवनीत कौर (२२वे मिनीट) आणि अन्नू (२९वे मिनीट) यांनी हिंदुस्थानसाठी गोल केले. मात्र, अर्जेंटिनाने हा सामना ४-२ असा जिंकला. यजमान संघाकडून मारिया एमिलिया लार्सन (११वे मिनीट), व्हिक्टोरिया ग्रॅनाटो (१८वे मिनीट) आणि जुलिएटा जानकुनास (४२वे, ५५वे मिनीट) यांनी गोल नोंदवले.

१४ एप्रिलला झालेल्या दुसऱ्या सामन्यात इशिकाने (२२वे मिनीट) हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, अर्जेंटिनाने पुनरागमन करत २-१ असा निसटता विजय मिळविला. अर्जेंटिनाकडून दोन्ही गोल अगस्टिना गोरजेलानी (३४वे, ४८वे मिनीट) हिने केले.

१६ एप्रिलला झालेल्या तिसऱ्या सामन्यात हिंदुस्थानने शानदार पुनरागमन केले. नवनीत कौर (२६वे मिनीट) आणि नेहा (३७वे मिनीट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करत हिंदुस्थानला २-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाकडून अगस्टिना गोरजेलानीने (५२वे मिनीट) उशिरा गोल केला, तरी भारतीय संघाने संयम राखत २-१ असा विजय मिळवला आणि मालिकेतील आशा कायम ठेवल्या.

१७ एप्रिलला झालेला अखेरचा सामना चुरशीचा ठरला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले आणि सामना ०-० असा बरोबरीत सुटला. मात्र, हिंदुस्थानच्या बचावफळीने संपूर्ण सामन्यात भक्कम प्रदर्शन करत अर्जेंटिनाला रोखून धरले. यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये हिंदुस्थानी महिलांनी संयमित खेळ करत ३-२ असा विजय मिळवला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविली.