गुरुग्राममध्ये बनावट ‘मौंजारो’ इंजेक्शनचा भंडाफोड, 56 लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील गुरुग्राममध्ये उशिरा रात्री अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत बनावट ‘मौंजारो क्विकपेन’ इंजेक्शनचे रॅकेट उघडकीस आणला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 56.15 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गुरुग्राम-1 चे औषध नियंत्रण अधिकारी अमनदीप चौहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुडा सिटी सेंटर मेट्रो स्थानकाजवळ सापळा रचला. सायंकाळी सुमारे 7:25 वाजता संशयित कार थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासादरम्यान कारमधील चालक शहबाज आलम अन्सारी हा ओला कॅब चालक असल्याचे समोर आले. त्याला दिल्लीहून गुरुग्रामपर्यंत प्रवासी सोडण्यासाठी हजार रुपये देण्यात आले होते. कारमधील प्रवासी मुजम्मिल खान याच्याकडे मोठ्या प्रमाणात ‘मौंजारो’ इंजेक्शनचा साठा आढळून आला. खान हा गुरुग्राममध्ये कार्यरत वैद्यकीय प्रतिनिधी असल्याची माहिती मिळाली.

चौकशीत खानने हा साठा गुरुग्राममधील अवी शर्मा याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर शर्मा याला संपर्क साधून घटनास्थळी बोलावण्यात आले. मात्र, तो औषध साठवण, विक्री किंवा वितरणासाठी कोणताही वैध परवाना दाखवू शकला नाही. चौकशीत त्याने हा साठा स्वतःच्या सेक्टर 62 येथील घरात तयार केल्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर खान आणि शर्मा या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या इंजेक्शनमध्ये 2.5 mg ते 15 mg पर्यंत विविध डोसचे बॅचेस आढळले. या सर्व साठ्याची नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. तसेच, ही औषधे आवश्यक असलेल्या 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात साठवलेली नव्हती, यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत.

प्राथमिक तपासात या इंजेक्शनच्या पॅकेजिंगमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. मूळ उत्पादक कंपनी Eli Lilly and Company च्या लेबलशी तुलना करता फॉन्ट, विरामचिन्हे, उत्पादन तपशील आणि टोल-फ्री क्रमांकात फरक दिसून आला. त्यामुळे हा साठा बनावट असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 18(c) आणि 17B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत बनावट औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्यास कडक शिक्षा होऊ शकते.

वजन कमी करण्याठी इंजेक्शनची मागणी

‘मौंजारो’ (Mounjaro) हे मूळतः टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी वापरले जाणारे इंजेक्शन असले, तरी सध्या ते वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. या औषधातील टिर्झेपाटाइड घटक भूक कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे वजन घटण्यास सहाय्य होते. त्यामुळे अनेकजण वजन नियंत्रणासाठी याचा वापर करत आहेत. मात्र, हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरणे धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.