वाराणसीमध्ये शिवाला घाटावर मोठी दुर्घटना टळली; आंध्र प्रदेशातील १५ भाविकांना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाला घाटावर स्नान करत असताना पंधरा भाविक अचानक खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ धाडस दाखवून सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न आणि बोटींचा वापर स्पष्टपणे दिसत आहे.

NDTV INDIA ने दिलेल्या बातमीनुसार, आंध्रप्रदेशातील १५ भाविक हे गंगास्नानासाठी गंगेत उतरले. परंतु या भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने, ते बुडू लागले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नाविकांनी आणि स्थानिकांनी धाडस दाखवत या सर्वांना वाचवले. बुडालेल्यांपैकी तीन तरुणींची स्थिती गंभीर होती. त्यांना तात्काळ सीपीआर देऊन वाचवण्यात आले. सर्व १५ भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आता सर्वांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

शिवाला घाटावर घडलेल्या या घटनेत, उपस्थित असलेल्या लोकांनी धाडस दाखवत सर्व भाविकांना सुखरूपपणे बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांना खोल पाण्यात बुडण्यापासून वाचवताना स्पष्टपणे दिसत आहे. लोकांना वाचवताना, “घट्ट धरून ठेवा, घट्ट धरून ठेवा,” आणि “काळजी घ्या,” असे आवाज ऐकू येत आहेत. जवळच बोटीसुद्धा दिसत आहेत. भाविकांना वाचविण्यासाठी एका माणसाने बोटीतून उडी मारत भाविकांकडे झेप घेतली. तर उपस्थित असलेल्यांपैकी काही लोकांच्या हातात लांब बांबूसुद्धा दिसत असून, त्यांच्या साहाय्याने ते बुडणाऱ्या लोकांना वाचवत आहेत. घटनास्थळी पूर्णपणे गोंधळाचे वातावरण झाले होते.