
नेस्को प्रदर्शन केंद्रातील पार्टी प्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांनी अटक केली. प्रदीप गुप्ता असे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने काहींना प्रवेशिका नसतानाही देखील पार्टीच्या ठिकाणी सोडल्याचा त्याच्यावर ठपका आहे. पार्टी प्रकरणातील ही दहावी अटक आहे.
काही दिवसापूर्वी नेस्को प्रदर्शन केंद्रात पार्टी दरम्यान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या दोघांच्या मृत्यूनंतर वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपास हाती येताच पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करून आयुष याला पोलादपूर येथून ताब्यात घेतले. तो गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होता. रायगड पोलीस आणि वनराई पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली.
आयुषचे काही जणांशी आर्थिक व्यवहार झाले होते. पार्टीत विना पास प्रवेश मिळवण्यासाठी त्याने बाउन्सर आणि काही सुरक्षा रक्षकांना पैसे दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर वनराई पोलिसांनी गुप्ताला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
ड्रगच्या गुन्ह्यात महिलेला अटक
ड्रगच्या गुह्यात फरार असलेल्या एका महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अटक केली. तिच्या अटकेने अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवडय़ात घाटकोपर युनिटचे अधिकारी हे अंधेरी आणि साकीनाका येथे गस्त करत होते. रात्री अंधेरी-पुर्ला रोड येथे काही तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तेथे गेले. पोलिसांना पाहताच एकाने त्याच्याकडील पिशवी रस्त्यावर टापून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीत 25 लाख रुपये किमतीच्या 104 एमडीएमएच्या गोळय़ा आढळून आल्या. त्याच्या चौकशीत आणखी एकाचे नाव समोर आले.


























































