
संगमेश्वर जवळच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एका मालवाहू चारचाकी वाहनाचा अत्यंत भीषण अपघात झाला. ओझरखोल येथील परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकले आणि त्यानंतर पलटी झाले. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की गाडीचा मोठा आवाज परिसरात ऐकू आला. मात्र या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही आणि केवळ वाहनाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
हा अपघात रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. एम एच ०७ ए जे १६७२ या क्रमांकाचे मालवाहू वाहन ओझरखोल परिसरातून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, अशी माहिती मिळते आहे.
अतिवेगामुळे वाहन चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटून गाडी थेट दुभाजकावर चढल्याने हा अपघात घडला असवा, असे कळते आहे.
ज्यावेळी हा अपघात झाला त्या वेळी महामार्गावर इतर वाहनांची मोठी ये-जा सुरू होती. परंतु सुदैवाने पलटी झालेली ही गाडी विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर गेली नाही, अन्यथा समोरून येणाऱ्या इतर वाहनांशी मोठी धडक होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असले तरी चालक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.




























































