
पेपर फुटल्यामुळे ‘नीट यूजी’ परीक्षा रद्द करून 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, फेरपरीक्षेचाही पेपर फुटल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. टेलिग्राम या सोशल मेसेजिंग अॅपवरील काही ग्रुप्स आणि चॅनेलवर ही प्रश्नपत्रिका 35 हजार रुपयांमध्ये विकली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘एक्स’ या मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. एकाच व्यक्तीकडून टेलिग्रामवरील हे सर्व ग्रुप्स चालवण्यात येत असल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.
प्रिन्स श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये या टेलिग्राम चॅनलचे काही स्क्रीनशॉटस् टाकले आहेत. प्रायव्हेट माफिया या नावाने टेलिग्रामवर खाते असलेली व्यक्ती हे सर्व ग्रुप आणि चॅनेल चालवत असल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे. याशिवाय प्रश्नपत्रिकांचे काही गठ्ठे एका खोलीत ठेवलेले असल्याचेही काही छायाचित्रे त्याने टाकली आहेत. या फोटोवर 500 लाईक्स मिळाल्यास 10 प्रश्न टेलिग्राम ग्रुपमध्ये सोडवण्यात येतील, असे पेपर फोडणारे म्हणत असल्याचे त्यात दिसते. त्यासाठी 35 हजार रुपये ऍडव्हान्स घेण्यात येतील, असा या माफीयाचा मेसेजदेखील दिसतो.
एनटीएची सायबर सेलकडे तक्रार
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एनटीएत खळबळ उडाली. एनटीएने तातडीने याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर सेल या पोस्टबाबत तपास करत आहे. पोस्टमधील दाव्याची पडताळणी करण्यात येत असून त्यात तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या पोस्टमधील फोटो एआयद्वारे बनवण्यात आल्याचा दावाही करण्यात येत आहे.
- नीट परीक्षा आधीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडलेली आहे. 3 मे रोजी झालेली ही परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली होती. देशभरातील पाच हजारांहून अधिक परीक्षा केंद्रांवर 22 लाखांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा रद्द झाल्याने लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.



























































