शिवसेनेचे गोरेगावमध्ये महागाईविरोधात आंदोलन, रस्त्यावर चूल पेटली, बैलगाडी-हातगाडी आली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करीत महागाईविरोधात शिवसेनेने आज गोरेगावमध्ये जोरदार आंदोलन केले. रस्त्यावर चूल पेटली, हातगाडी-बैलगाडी आणून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

 शिवसेनेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या. महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून भाकऱ्या भाजल्या. वाढलेल्या महागाईत सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार सुनील प्रभू म्हणाले की, वाढलेली महागाई ही सरकारचे अपयश आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. बैलगाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेने थेट हातगाडी रस्त्यावर आणून सरकारचा निषेध केला. या वेळी आमदार अनंत (बाळा) नर, माजी महापौर नगरसेवक अ‍ॅड. सुहास वाडकर, नगरसेवक अंकित प्रभू यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. ‘मोदी हटाव, देश बचाव’ अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या. शिवाय मेलोडी चॉकलेट वाटप करून सरकारच्या जनताविरोधी धोरणांचा निषेधदेखील करण्यात आला.

विलेपार्लेत सरकारचा जोरदार निषेध

शिवसेना विभाग क्र. 4 आणि 5 मध्ये शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली महागाईविरोधात जोरदार आंदोलन करीत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार वरुण सरदेसाई, आमदार हारून खान, महिला संघटिका अनिता बागवे यांच्यासह  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेंबूरमध्ये जनआक्रोश, सरकारचा धिक्कार!

महागाईविरोधात शिवसेना विभाग क्र. 9च्या वतीने शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रमोद शिंदे व विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर स्टेशन येथे जनआक्रोश आंदोलन झाले. यावेळी निधी शिंदे, संजय नटे, महेंद्र नाकटे, निमीष भोसले, नीलम डोळस, संध्या सावंत, प्रीतम निंबाळकर, अरुण हुले, शिवाजी गावडे, स्मिता गांवकर, शेखर चव्हाण व अविनाश शेवाळे उपस्थित होते.