
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदारांचा वेगळा गट स्थापन केला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला झटपट मान्यता देत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बंडखोर गटाचे नेते ऋतव्रत बॅनर्जी यांची नियुक्ती जाहीर केली. मात्र आता या बंडखोर गटामध्येही अंतर्गत मतभेद सुरू असल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी आमच्या नेत्या असल्याचे विधान बंडखोर गटातील आमदार गुलशन मलिक यांनी केले आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
बंडखोर आमदारांनी पक्षात कायम राहण्यासाठी नेतृत्व बदलाची अट घातली आहे. मात्र, याच मुद्द्यावरून आता बंडखोर गटातच अंतर्गत मतभेद आणि फूट पडताना दिसत आहे. बंडखोर गटात सामिल झालेले हावडा येथील पांचला मतदारसंघाचे आमदार गुलशन मलिक यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.
जर ममता बॅनर्जी केवळ मार्गदर्शक म्हणून काम करणार असतील आणि मुख्य नेतृत्व सोडणार असतील, तर ते आम्हाला अजिबात मंजूर नाही. ममता बॅनर्जी याच आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत आणि राहतील, असे गुलशन मलिक यांनी म्हटले आहे.
हावडा जिल्ह्यातील 5 ते 6 आमदारांशी या विषयावर आपली सविस्तर चर्चा झाली असून आमदारांच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, असा दावा गुलशन मलिक यांनी केला आहे. ममता बॅनर्जी या आमच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांना बाजूला सारून केवळ मार्गदर्शक बनवण्याचा जो डाव आखला जात आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. हावड्यातील आमच्यासारखे 6 ते 7 आमदार ममता बॅनर्जी यांना केवळ मार्गदर्शक म्हणून नाही, तर मुख्य नेत्या म्हणूनच पाहतात, असे मलिक यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदारांनी बंडाची भूमिका घेतली. ममता बॅनर्जी या केवळ आमच्या मार्गदर्शक राहतील आणि पक्षाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपवली जाईल, अशी भूमिका गटाने घेतली होती. मात्र, आता आमदार गुलशन मलिक यांच्या विधानामुळे बंडखोरांच्या गटातच दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी या पुन्हा सक्रिय झाले असून बंडखोर आमदारांशी संपर्क साधून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


























































