मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातून राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केला अर्ज; राहुल गांधी, सिद्धरामय्या होते उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी कर्नाटकातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील विधानसौध संकुलातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्यासोबत उपस्थित होते. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आगामी १८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी आपल्या ७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पक्षाने कर्नाटकातून मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मन्सूर अली खान आणि पवन खेडा यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानमधून नीरज डांगी, तामिळनाडूतून प्रविण चक्रवर्ती आणि झारखंडमधून प्रणव झा यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, ३ जून रोजी निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात प्रत्येकी ४ जागा; राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रत्येकी ३ जागा; झारखंड २ जागा; आणि महाराष्ट्र, तामीळनाडू, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी १ जागेचा समावेश आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जून आहे.