
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील चलनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँक देशात पॉलिमर चलन नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे, असे मल्होत्रा म्हणाले. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. यापूर्वीही प्लास्टिक नोटा आणण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते अयशस्वी ठरले होते. चलनाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, आरबीआय पॉलिमर चलन, म्हणजेच प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
देशात फेब्रुवारी २०१२ मध्ये पाच शहरांमध्ये (कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला) प्लास्टिकच्या १० रुपयांच्या नोटांची चाचणी केली होती. तथापि, एटीएम आणि इतर यंत्रांमध्ये मोठ्या समस्यांमुळे ती बंद करण्यात आली. पॉलिमर नोटा कागदाऐवजी लवचिक, प्लास्टिकपासून बनवल्या जातात. पॉलिमर नोटा कार्डांइतक्या कडक नसतात, त्यामुळे त्या कागदी नोटांप्रमाणे दुमडल्या जाऊ शकतात. कागदी चलनापेक्षा पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात. पॉलिमर चलनावर धूळ आणि ओलाव्याचा कमी परिणाम होतो. पॉलिमर चलनाचे दीर्घायुष्य असल्यामुळे नोटांच्या वारंवार छपाईची गरज कमी होते.
पॉलिमर चलन वापरणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. यानंतर कॅनडा, युके, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानिया यांनीही पॉलिमर चलन वापरण्यास सुरुवात केली. आता हिंदुस्थानातही याबाबत विचार सुरू आहे.



























































