मालवीय नगर आग दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा भाजप लपवत आहे, आपचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी शुक्रवारी आरोप केला की, भाजप मालवीय नगरमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा लपवत आहे आणि जाणीवपूर्वक विरोधी नेत्यांना पीडितांना भेटण्यापासून रोखत आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पत्रकारांशी बोलताना आतिशी म्हणाल्या की, “भाजपच्या सूचनेवरून मॅक्स रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत प्रवेश दिला नाही. अनेक लोक मृत्यूशी झुंज देत आहेत, तरीही भाजप सत्य लपवत आहे. मी भाजपला विचारते, मृतांचा आकडा २१ च्या पुढे गेला आहे का? कदाचित खरी आकडेवारी देशाला सांगितली जात नाहीये. जर भाजपचे नेते रुग्णांना भेटू शकतात, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांना आणि डॉक्टरांना भेटण्यापासून का रोखले जात आहे? असे काय सत्य आहे जे समोर येऊ नये, असे भाजप नेत्यांना वाटते.”

बुधवारी पहाटे दक्षिण दिल्लीतील दाट लोकवस्तीच्या मालवीय नगर परिसरातील फ्लोरीश इन (Flourish Inn) नावाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १७ परदेशी नागरिकांसह किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना इमारतीमध्ये अग्निसुरक्षेचे अनेक नियम धाब्यावर बसवल्याचे आणि सुरक्षेच्या मूलभूत सुविधांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.