
गुटखा खाऊन रस्त्यावर धुंकल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या ओलाचालकाने एका वृद्धाला त्यांच्या पत्नीसमोरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. निशान शुक्ला असे या चालकाचे नाव असून त्याला वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्ला याने वृद्धाला एवढे बेदम मारले की त्यांचा पाय फॅक्चर झाला असून या घटनेमुळे परप्रांतीय चालकांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध होताच नेटकऱ्यांनीदेखील या मग्रुरीला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी केली आहे.
ठाण्यातील गजबजलेल्या ज्युपिटर रुग्णालय परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निशान शुक्ला या ओलाचालकाने आपली कार रस्त्याच्या बाजूला लावली होती. त्याच भागातून दस्तुर नावाचे वृद्ध आपल्या पत्नीसह जात असताना शुक्ला हा गुटखा खाल्ल्यानंतर रस्त्यावर थुंकत असल्याचे दिसून आले. दस्तुर यांनी त्याला विरोध करत रस्त्यावर का धुंकतोस असे विचारले. त्यावर संतप्त झालेल्या ओलाचालकाने दस्तुर यांना शिवीगाळ करून त्यांच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली. जोरात लाथाबुक्क्या मारल्याने ते जमिनीवर कोसळले. विशेष म्हणजे त्यानंतरही चालकाची दादागिरी सुरूच होती.
शिवसैनिकांनी चोप दिला
या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी काढून तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ बघताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख सुमित बोराटे यांनी ओलाचालक निशांत शुक्ला याला शोधून काढले. एवढेच नव्हे तर बोराटे यांच्यासह शिवसैनिकांनी या चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनीही धाव घेऊन परप्रांतीय चालकांना धडा शिकवला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओलाचालक निशान शुक्ला याच्यावर ३०७कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.





























































