
>> सोहम पिंगळीकर ([email protected])
आजही कांती शाहचा ‘गुंडा’ वाईट सिनेमांच्या यादीत अढळपणे अग्रस्थानी आहे. चांगला सिनेमा करणं अवघड असतंच; पण ठरवून असा ‘वाईट’ सिनेमा करणं त्याहून अवघड असतं, याचेच हे एक उदाहरण.
आयआयटी खरगपूरच्या हॉस्टेलमध्ये नव्या विद्यार्थ्यांना रॅगिंग म्हणून एक सिनेमा दाखवला जायचा. चित्रविचित्र पात्रं, अतर्क्य संवाद आणि प्रत्येक गोष्टीचा अतिरेक असलेल्या या सिनेमावर प्रतिक्रिया लिहायची शिक्षा होती. पण झालं काहीतरी वेगळंच. वाह्यात म्हणून ओळखल्या जाणाऱया या सिनेमाच्या नियमित क्रीनिंग्स होऊ लागल्या, संवाद म्हटले जाऊ लागले आणि त्याभोवती एक भक्कम सबकल्चर तयार झालं. पुढे विद्यार्थ्यांनी IMD वर या सिनेमाला इतकी चांगली रेटिंग दिली की काही काळासाठी तो थेट ‘गांधी’ आणि ‘गॉडफादर’सारख्या सिनेमांच्या आसपास जाऊन बसला. आणि आजही कांती शाहचा ‘गुंडा’ वाईट सिनेमांच्या यादीत अढळपणे अग्रस्थानी आहे.
रामसे बंधूंनंतर बी-ग्रेड सिनेमा केवळ भुताखेतांच्या कहाण्यांपुरता मर्यादित राहिला नाही. किशन शाह, विनोद तलवार, दिलीप गुलाटी आणि जे. नीलम यांनी अॅक्शन, थ्रिलर, क्राईम, जंगल अॅडव्हेंचर आणि इरॉटिका असे विविध प्रकार हाताळले. पण या काळात बी-ग्रेडचा खरा बादशहा होता कांती शाह. त्याच्या लोहा, डाकू रामकली, डुप्लिकेट शोले, मुन्नीबाई यांसारख्या सिनेमांना मोठी मागणी होती. मात्र ‘गुंडा’ इतका गाजला की कल्ट सिनेमाची संकल्पना अनेक भारतीय प्रेक्षकांना याच सिनेमामुळे समजली, असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही.
वरकरणी ‘गुंडा’ ही बहिणीच्या मृत्यूचा बदला घेणाऱया शंकर हमालाच्या सूडाची गोष्ट आहे. पण कथा सोडून दिली तरी या एका चित्रपटात हाणामारी, बलात्कार, लग्न-विदाई, अंतिम संस्कार, टिंकू नावाचं माकड आणि मुख्य भूमिकेत कल्टस्टार मिथुन चक्रवर्ती असा सगळा भरणा आहे. पण सिनेमाची खरी मजा त्याच्या खलनायकांमध्ये आहे. शक्ती कपूरचा चुटिया, शिवाय लंबू आटा, लकी चिकना, बच्चुभाई भिंगोना अशी इतर मंडळी. नावं जितकी विचित्र, तितकेच संवाद. “मेरा नाम है इबु हटेला, मां मेरी चुडैल की बेटी, बाप मेरा शैतान का चेला, खायेगा केला” सारखे संवाद हे भारतीय सिनेमातील वेगळ्याच काव्यपरंपरेचे नमुने आहेत.
‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल से’सारखे सिनेमे येत असताना 1998 मध्ये ‘गुंडा’ प्रदर्शित झाला. अश्लीलतेच्या आरोपांमुळे त्याच्यावर केसेस झाल्या, काही काळासाठी प्रदर्शनही थांबवलं गेलं. छोटय़ा शहरांमध्ये मात्र फिल्म तुफान चालत होता. पण इतका भडिमार असलेला हा सिनेमा लोकांना कशामुळे आवडतो? हे समजून घेण्यासाठी `So Bad It’s Good’ ही संकल्पना उपयुक्त ठरते. काही सिनेमे इतके वाईट असतात की त्यातला अतिरेक, अतार्किकता, तांत्रिक चुका आणि खोटेपणाच करमणुकीचा भाग बनतो. उद्देश काहीही असो, परिणाम भलताच होतो. आता दुसऱयाच्या अपयशावर हसायला कोणाला आवडत नाही? म्हणून प्रेक्षक या सिनेमांवर हसतात, त्यांची टिंगल करतात आणि त्याच प्रक्रियेत त्याच्यावर प्रेमही करू लागतात.
जागतिक स्तरावर ‘द रूम’ या चित्रपटाला असाच जवळजवळ अपघाताने कल्ट दर्जा मिळाला. दिग्दर्शकाचा प्रामाणिक प्रयत्न इतक्या विचित्र पद्धतीने फसला की ती जगातील सर्वात वाईट फिल्म म्हणून प्रसिद्ध झाली. आजही तिच्या क्रीनिंग्जमध्ये प्रेक्षक डायलॉगची नक्कल करतात, पडद्यावर चमचे फेकतात आणि सामूहिकरीत्या तिची खिल्ली उडवतात. भारतात फिरोज खानच्या ‘प्रेम अगन’ची काहीशी अशीच गत झाली. पण ‘गुंडा’ची गोष्ट थोडी वेगळी आहे. तो ज्या बी-ग्रेड परंपरेतून आला, तिथे अतिरेक ही उणीव नसून शैलीच होती. कांती शाहने त्याच्या प्रेक्षकांना हवे नेमके तेच पोहोचवले. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, तो खरोखर अपयशी सिनेमा म्हणायचा का? तर मुळीच नाही.
मोजक्या बजेटमध्ये आणि 15 दिवसांत बनलेल्या या सिनेमात पात्रांची नावं, संवाद, अभिनय, हिंसा, संगीत सगळंच प्रमाणाबाहेर आहे. प्रत्येक प्रसंगाला जगबुडीचं महत्त्व असतं आणि प्रत्येक पात्र मुख्य नायक असल्याच्या आत्मविश्वासाने वावरतं. प्रत्येक दृश्य मागच्या दृश्यापेक्षा अधिक विचित्र असावं हीच महत्त्वाकांक्षा आहे. म्हणूनच सायकलच्या मागे लपून बंदूक चालवणारा मिथुन चक्रवर्ती पाहून प्रेक्षक गडाबडा हसतो आणि आता याहून काय विचित्र पाहायला मिळेल याची वाट बघत बसतो. हळूहळू ही टिंगल इतकी वाढली की लोकांनी ‘गुंडा’कडे टुकार सिनेमा म्हणून नव्हे, तर बी-ग्रेड सिनेमांचा मास्टरपीस म्हणून पाहायला सुरुवात केली. आज कोणी ‘गुंडा’ पाहिला नसेल तर त्याने अजून खरा सिनेमा पाहिलेलाच नाही, असं म्हणत त्या व्यक्तीची खेचली जाते. या उपहासात्मक प्रेमातून या सिनेमाला एक विचित्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ‘गुंडा’कडे पाहताना प्रेम आणि उपहास यांच्यातली सीमारेषा धूसर होते. प्रेक्षक त्याची थट्टा करतात की त्याचा सन्मान, हे सांगणं कठीण होतं.
हिमेश रेशमियाने ‘द एक्स्पोज’मध्ये अशाच अतिरेकी नाटकीपणाचा वापर केला. त्याचे रविकुमार नावाचे पात्र आणि त्याचे अफाट डायलॉग इतके गाजले की पुढे त्याचा ‘बॅडअस रविकुमार’ असा दुसरा भाग आला. फारसं डोकं न लावता पाहायचा सिनेमा म्हणून हा भागसुद्धा गाजला. पण म्हणून प्रत्येक वाईट सिनेमा कल्ट होत नाही हे लक्षात घ्यायला हवं. मग प्रश्न उरतो की एखाद्या सिनेमाला असं मुद्दामहून कल्ट बनवता येतं का, की कल्ट हा नेहमीच थोडासा अपघात असतो?
कदाचित म्हणूनच ‘गुंडा’सारखे चित्रपट महत्त्वाचे ठरतात. ते पाहिल्यावर कळतं की चांगला सिनेमा करणं अवघड असतंच; पण ठरवून असा ‘वाईट’ सिनेमा करणं त्याहून अवघड असतं. कदाचित दशकानुदशकं पारायण करतील असा ‘वाईट’ सिनेमा तयार करणं हे फक्त कांती शाहसारख्या बी-ग्रेड बादशहालाच जमू शकतं.
(लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)
























































