
>> अरुण
अमेरिकेतलं अॅमेझॉनचं सुमारे 67 लाख चौरस किलोमीटर भूभाग व्यापणारं महाअरण्य खरोखरच अमेझिंग किंवा विस्मयकारी आहे. याचा विशाल विस्तार हीच पहिली नवलाची गोष्ट. यातला 55 लाख चौरस किलोमीटरचा भाग पर्जन्यवनाचा (रेन फॉरेस्टचा) आहे. हे विराट वन मुख्यत्वे दक्षिण अमेरिका खंडातल्या ब्राझीलमध्ये 60 टक्के, पेरूमध्ये 13 टक्के, आणि कोलंबियामध्ये 10 टक्के असून याचा थोडासा भाग बोलिव्हिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर या देशांतही येतो.
अॅमेझॉनच्या जंगलात 390 अब्ज झाडांची वन संपत्ती असून त्यामध्ये 16 हजार विविध प्रजाती आहेत. जॅग्वार, नदीतले डॉल्फिन असे अनेक दुर्मिळ सजीव तिथे नांदतात. सुमारे 4 कोटी 70 लाख माणसं या भागात राहतात. त्यांच्या 300 बोलीभाषा आहेत.
या दाट अरण्यातल्या अब्जावधी झाडांद्वारे इतकी वाफ वातावरणात सोडली जाते की, त्या प्रचंड ‘वाफाऱया’ला उडत्या नद्या (फ्लाइंग रिव्हर्स) म्हटलं जातं. या उडत्या नद्यांच्या प्रवाहांमुळे पृथ्वीवरच्या वातावरणाचं स्वरूप ठरवलं जातं. प्रचंड वनश्री असलेल्या या भागात वातावरणातला कार्बन वनस्पतींच्या सिन्थेसिस किंवा हरितद्रव्य निर्मितीसाठी शोषला जातो. त्यामुळे पृथ्वीवरचा 20 टक्के ऑक्सिजन (प्राणवायू) या भागात तयार होतो. मात्र त्याचा उपयोग बाहय़ जगाला फारसा होत नाही. कारण जितका प्राणवायू बनतो तेवढाच त्याचा वापर या परिसरातले सजीव श्वसनासाठी करतात. त्यामुळे बाकी जवळपास ‘शून्य’ उरते!
दुष्काळाच्या काळात गरम वादळी वाऱयांमुळे झाडांची लाकडं परस्परांवर घासली जाऊन महावणवे पेटतात. अशा अनेक वणव्यांनी ‘हॉलीवूड‘चाही काही भाग भस्मसात केला आहे. हा नैसर्गिक उत्पात असतो. मानवी प्रयत्नांनी तो थोडासाच कमी करता येतो.
आणखी एक गोष्ट या ‘अमेझिंग’ जंगलाला भेडसावते ती मात्र मानवी हव्यासाच्या जंगलतोडीची. मूळ वनसमृद्धीपैकी सुमारे 17 टक्के वनसंपदा यातून नष्ट झाली आहे. अॅमेझॉनच्या जंगलात दडलेल्या खनिजांच्या लोभाने किंवा मानवी वसाहतींसाठी ही जंगलतोड होते.
निसर्गाने अॅमेझॉन खोऱयाला ‘अनंत हस्ते’ वनवैभव ‘बहाल’ केलंय, पण माणूस नावाचा प्राणी काहीही ‘बेहाल’ करू शकतो. अॅमेझॉनचं वैशिष्टय़ ही केवळ दुर्मिळ वस्तू जपण्याची नव्हे, तर आपल्या जगण्याचीच गोष्ट आहे हे माणसाला कधी समजेल?


























































