ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी! महाराष्ट्रातील फोटोग्राफर्सनी सियाचीन बॉर्डरवर वाहिली शहिदांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखचा बर्फाच्छादित सियाचीन प्रदेश.. उणे ५५ सेल्सिअस तापमान… हाडे गोठवणारी थंडी… पहावे तिथे फक्त आणि फक्त बर्फाचे ढिगारे… शेकडो सैनिक शत्रूशी लढता लढता या बर्फात शहीद झाले. या शूरवीर शहिदांना महाराष्ट्रातील छायाचित्रकारांनी श्रद्धांजली अर्पण करत मानवंदना दिली. तेव्हा ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी या ओळी आपसूकच त्यांच्या तोंडून बाहेर पडल्या..

हिंदुस्थानी संरक्षण दलाच्या वतीने दरवर्षी सियाचीन ग्लोशीयर ट्रेकिंग एक्सपीडिशन या मोहिमेचे आयोजन केले जाते. तरुणांच्या साहसी आणि विजीगिषू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम असते. २५ ते ३० जणांचीच या मोहिमेत निवड केली जाते. ज्येष्ठ छायाचित्रकार वैभव जागुष्टे यांच्या पुढाकाराने संजय जागुष्टे, सुधीर नाझरे, संजय सकपाळ, प्राची मोरे, डॉ. श्री मोरे, राजेंद्र वाघमारे, तावनीत कौर, आयेशा कौर या मोहिमेत सहभागी झाले.

लडाखच्या समरकत येथे ही फळी पोहोचली तेव्हा छायाचित्रकारांनी जगासमोर आणण्यासाठी कॅमेऱ्यातून सुंदर छायाचित्रातून तिथला निसर्ग टिपला. उणे ५५ अंश सेल्सिअस तापमानात हिंदुस्थानी जवान देत असलेला खडा पहारा पाहून या छायाचित्रकारांनी त्यांना सॅल्यूट केला. या समरकतच्या बर्फाच्छादित प्रदेशात देशाची उत्तर सीमा लढवत शहीद झालेल्या जवानांची शौर्यगाथा ऐकताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणि मस्तक जमिनीवर झुकले होते, अशी माहिती मुरुड-जंजिरा येथील प्रख्यात छायाचित्रकार सुधीर नाझरे यानी दिली.