
दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणी टाकण्यात आलेले लोखंडी जाळ्यांचे आवरण, पाणी साचणाऱ्या सखल भातात रेल्वे मार्गालगत तयार केलेले नाले आणि रुळांमध्ये साचलेले पावसाचे पाणी उपसण्यासाठी ठिकठिकाणी बसवण्यात आलेले उपसापंप यांमुळे कोकण रेल्वेचा यंदा पावसाळ्यातील प्रवास दरडमुक्त होणार आहे. पावसाळ्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून येत्या सोमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर धोकादायक ठिकाणी गस्त घालणार आहेत.
कोकण क्षेत्रात दरवर्षी सुमारे चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतात. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा जोरदार तयारी केली आहे. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावर दरड आणि दगड येऊ नयेत यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. त्यासाठी काही ठिकाणी दरडींची कटिंग करण्यात आली आहे. गॅबियन वॉलही बांधण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचते. त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर होतो. अशा जागांचा सर्व्हे करून तिथे लोहमार्गानजीक नाले तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रेल्वे मार्गात साचलेले पाणी उपसण्यासाठी उपसापंपही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास कोणताही व्यत्यय न येता सुरू राहणार आहे, असा विश्वास कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांनी आज सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वेग मंदावणार
कोकण रेल्वेने येत्या १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. या कालावधीत जर पावसामुळे दृश्यतामान कमी असले तर ट्रेन ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याचे निर्देश लोको पायलटला देण्यात आले आहेत. लोहमार्गावर १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाणी साचलेले असल्यास ट्रेन थांबवण्याच्या सूचना पायलटला देण्यात आल्या आहेत. पाणी ओसरल्यानंतर थांबलेल्या ट्रेन पुन्हा मार्गक्रमण करणार आहेत, असेही संतोषकुमार झा यांनी यावेळी स्पष्ट केले.
रत्नागिरी आणि वेर्णा रेल्वे स्थानकात स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन तयार ठेवण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये ऑपरेशन थिएटर उपलब्ध असणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून जखमींवर तातडीने उपचार करता येणार आहेत.
कार रो रो सेवा कोकण रेल्वेने सुरू केली होती. मात्र या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ही कार रो रो सेवा बंद करण्यात आली आहे.



























































