
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा अपूर्ण रस्त्याच्या संदर्भात नागपूर खंडपीठात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराने केलेले गैरप्रकार आणि भ्रष्टाचार याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी कोर्टाचे लक्ष वेधले आहे. राज्यात 2 मुख्यमंत्री बदलले असून काम सुरू होऊन 6 वर्ष लोटले आहेत. मात्र 16 किमी रस्ता हा रस्ता 57 कोटींचा निधी वापरून देखील अपूर्ण राहिल्याने गडचिरोलीकरांना केवळ मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या संदर्भात कोर्टाने राज्य सरकार आणि संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. हा मार्ग अजूनही अपूर्ण आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय कित्येक अपघातांनी नागरिकांचे बळी घेतले आहेत. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी गेली काही वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत लोकप्रतिनिधी आणि सरकारकडे पाठपुरावा केला आहे. याचिकाकर्त्यांनी या महामार्गाची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.





























































