
हिंदुस्थान हा हिटलरसारखा हुकूमशाही देश नाही. अन्याय आणि जुलूमशाहीचा पराभव करणे हे आपले कर्तव्य असले, तरी चांगल्या गोष्टींचे जतन करणे आणि संवादाचे दरवाजे उघडे ठेवणे ही आपली संस्कृती आहे, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पाकिस्तानसोबतच्या संवादाबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करताना भागवत यांनी हे मत व्यक्त केले. केरळमधील थिरुवनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काही महिन्यांपूर्वी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे बंद करू नयेत, असे विधान केले होते. यावरून वाद सुरू असतानाच आता सरसंघचालकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही हिटलरसारखे नाही. ती आमची प्रवृत्ती नाही आणि आमचा मार्गही नाही. त्यामुळे आपण संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत. आपण अन्याय आणि जुलूम नष्ट केला पाहिजे, पण जे चांगले आहे त्याचे रक्षणही केले पाहिजे, असे ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, आजही पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत ज्यांना हिंदुस्थानची फाळणी चुकीची झाली असे वाटते. तिथे एक सुप्त प्रवाह असा आहे जो पाकिस्तानच्या द्वि-राष्ट्र सिद्धांताच्या विरोधात आहे. एकत्र राहणे जास्त चांगले होते, असे मानणारा मोठा वर्ग तिथे आहे. जर भविष्यात कधी युद्ध झाले आणि हिंदुस्थानने पाकिस्तानचा पूर्ण पराभव केला, तरीही तिथल्या जनतेला एकतर हिंदुस्थानच्या प्रवाहात सामील करून घ्यावे लागेल किंवा त्यांना तिथे शांततेने जगता आले पाहिजे. यासाठी संवादाचे मार्ग खुले असणे आवश्यक आहे.
हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच घोषणेची गरज नाही! मोहन भागवत यांचे वक्तव्य
दत्तात्रेय होसबळे यांचे विधान नेमके काय?
दत्तात्रेय होसबळे यांनी गेल्या महिन्यात पीटीआयला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले होते की, देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान राखणे हे सरकारचे काम आहे आणि ते केलेच पाहिजे. पण त्याच वेळी आपण संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. संवाद साधण्यासाठी आपण नेहमी तयार असायला हवे. होसबळे यांच्या या विधानाला भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पाठिंबा दिला होता.
























































