
या वर्षी प्रचंड उकाडा जाणवण्याची आणि पर्जन्यमान कमी असण्याची शक्यता जगभरातून वर्तवण्यात येत होती. तसेच जागतिक हवामान बदलाचे परिणाम आणखी तीव्र होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. आता ती भीती खरी ठरत असल्याचे दिसत आहे. मॉन्सून महाराष्ट्रात कोकणात आला. मात्र, त्याचवेळी एल निनोचा प्रभाव वाढल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल रखडली आहे. याचा देशासह जगभरातील वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जगभरातील हवामान, वातावरण आणि समुद्राच्या तापमानावर परिणाम करणारा ‘प्रबळ ते अति-प्रबळ’ एल निनो निर्माण होण्याची शक्यता सुमारे ६६ टक्के इतकी आहे. त्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे. एल निनो ही हवामान प्रणालीतील सर्वात महत्त्वाची घटना आहे आणि ती ‘एल निनो-सदर्न ऑसिलेशन’ (ENSO) या चक्राचा एक भाग आहे. ‘ला निना’ आणि ‘एल निनो’ हे या हवामान प्रणालीतील चक्राचे दोन परस्परविरोधी पैलू आहेत.
एल निनोच्या काळात, इक्वेडोरच्या किनारपट्टीपासून पश्चिमेकडे सुमारे १०,००० किलोमीटरपर्यंत पसरलेला समुद्राचा पट्टा अनेक महिने उबदार राहतो. यात सामान्यतः १ ते २ अंश सेल्सिअसची वाढ होते. तापमानातील ही काही अंशांची वाढ किरकोळ वाटते. मात्र, ती जगभरात विनाशकारी परिणाम घडवू शकते.
उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये एल निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने, समुद्राच्या पाण्यात आणखी उष्णता वाढेल. त्यामुळे आता तयारी सुरू करण्याची वेळ आली आहे, अशा इशारा संशोधकांनी दिला आहे. कोणत्याही दोन एल निनो घटना अगदी सारख्या नसतात, तरीही आपण अशा अनेक घटना पाहिल्या आहेत. त्यामुळे हवामान तज्ज्ञांना पुढे काय घडू शकते याची अंदाज घेत पुढील काळात योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे समुद्रातील उबदार पाण्याचा परिणाम हवेच्या प्रवाहावर होतो. त्यामुळे काही भागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा काही भाग कोरडे राहतात. यामुळे अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांसारख्या काही ठिकाणी वादळांची तीव्रता वाढू शकते, तर अटलांटिकमधील चक्रीवादळांची (हुरिकेन) तीव्रता कमी होऊ शकते.
एल निनोमुळे जगातील मत्स्यव्यवसायाला आधार देणाऱ्या अनेक सागरी परिसंस्थांचे जसे की प्रवाळ खडक (कोरल रीफ्स) आणि समुद्री गवताची क्षेत्रे (सी-ग्रास मेडोज) मोठे नुकसान होऊ शकते. एल निनोमुळे समुद्राच्या तापमानात तीव्र आणि व्यापक वाढ होण्याचे प्रकार घडतात, ज्यांना ‘मरीन हीट वेव्हज’ (सागरी उष्णतेच्या लाटा) असे म्हटले जाते.
जागतिक स्तरावर समुद्राचे तापमान आधीच उच्चांकाजवळ पोहोचले आहे. त्यामुळे एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या सागरी उष्णतेच्या लाटा अनेक संवेदनशील मत्स्यक्षेत्रांना अत्यंत कठीण परिस्थितीत किंवा विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकतात.
सागरी उष्णतेच्या लाटांमुळे स्थानिक उपसागर आणि खाड्यांमधील पाणी काही दिवस किंवा आठवडे सामान्य तापमानापेक्षा अधिक गरम होऊ शकते. मोठ्या स्वरूपात, २०१३-२०१४ मधील ‘नॉर्थईस्ट पॅसिफिक वॉर्म ब्लॉब’ (Northeast Pacific Warm Blob) सारख्या लाटा प्रचंड विस्तार धारण करू शकतात. यात टेक्सास राज्याच्या आकाराच्या तिप्पट क्षेत्रातील समुद्राचे तापमान अनेक महिने किंवा काही वर्षे सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त राहू शकते.
याचा परिणाम म्हणजे विशिष्ट पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेतलेल्या अनेक सागरी जीवांसाठी, सागरी उष्णतेच्या लाटांमुळे समुद्रात जगणे कष्टाचे ठरू शकते. काही मासे उबदार पाण्यात आपली चयापचय क्रिया (metabolism) इतकी वाढवतात की ते अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा वेगाने ऊर्जा खर्च करतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. सागरी उष्णतेच्या लाटेमुळे अलास्काच्या आखातात ‘पॅसिफिक कॉड’ माशांच्या संख्येत ७० टक्क्यांनी घट झाली होती. इतर परिणामांमध्ये प्रवाळांचा पांढरेपणा (bleaching), मोठ्या प्रमाणावर हानिकारक शेवाळाची वाढ (algal blooms), समुद्री वनस्पतींचा (seaweeds) नाश आणि सागरी सस्तन प्राणी किनाऱ्यावर अडकून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ यांचा समावेश होतो.
हवामान प्रणालीमध्ये ‘एल निनो’चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तो सक्रिय होतो, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे जाते. एल निनोच्या काळात सागरी उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. एल निनोच्या काळात अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर, उत्तरेकडून वाहणारे वारे सामान्यतः मंदावतात. यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि समुद्राच्या तळाशी असलेले थंड पाणी वर येण्याची प्रक्रिया (upwelling) मंदावते. परिणामी, किनारपट्टीवर सागरी उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता वाढते. कॅलिफोर्नियाचे पाणी आधीच अत्यंत उष्ण आहे. एल निनोमुळे परिस्थिती आणखी उष्ण होऊ शकते आणि ती अधिक काळ टिकू शकते.
भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरात, एल निनो आणि वॉकर सर्क्युलेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उष्णकटिबंधीय वायुप्रवाहाच्या पद्धतीमधील परस्परक्रियेमुळे सागरी उष्णतेच्या लाटांचा धोका वाढतो. १९९७-९८ मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तळाशी निर्माण झालेली सागरी उष्णतेची लाट, समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सामान्य पातळीवर आल्यानंतरही आणखी चार ते पाच महिने तशीच टिकून राहिली होती. जेव्हा सागरी उष्णतेची लाट समुद्रतळापर्यंत पोहोचली, तेव्हा २०१८ मध्ये बेरिंग समुद्रातील ‘स्नो क्रॅब’च्या (snow crab) पकडीत ८४ टक्क्यांनी घट झाली होती.
ताज्या अंदाजानुसार, ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असताना अनेक सागरी उष्णतेच्या लाटा निर्माण होतील आणि २०२६ च्या अखेरीस जागतिक महासागराच्या जवळपास निम्म्या भागापर्यंत हानिकारक उष्णता पोहोचेल. विशेषतः कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोच्या किनारपट्टीवर तीव्र सागरी उष्णतेच्या लाटा येण्याची दाट शक्यता आहे; तसेच हिंदी महासागर आणि दक्षिण महासागराच्या काही भागांतही हानिकारक उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो.
हिंदुस्थानवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. त्यामुळे एल निनोचा नैऋत्य मॉन्सूनवर विपरीत परिणाम होतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता असते. एल निनोचे तीव्र परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. जून महिना अर्धा उलून गेला तरीही अद्याप देशभरात सर्वत्र मॉन्सून पोहचलेला नाही. त्यामुळे जगासह हिंदुस्थानची चिंता वाढली आहे.




























































