
वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेत साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या 10 टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता 15 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.
उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीचे प्रभावी नियोजन आणि महसूलवाढीच्या उद्देशाने महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून साध्या बससेवांच्या भाड्यात 10 टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत 15 जून 2026 रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा विचार करता तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन या निर्णयास मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयानुसार साधी व मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर 11.05 रुपये कायम राहणार असून, किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी 14 रुपये आणि मुलांसाठी 7 रुपये असेच राहील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.





























































