तर इंदिरा गांधींनी धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपवर बंदी घातली असती, अशोक गेहलोत यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी भाजपवर जोरदार टीका करत धर्माच्या नावावर राजकारण, लोकशाही संस्थांवर दबाव आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरोधात वापर केल्याचा आरोप केला आहे. जयपूर येथे एका पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही निशाणा साधला.

अशोक गेहलोत म्हणाले की, हिंदुस्थानची राज्यघटना सर्व धर्मांना समान अधिकार देते. त्यामुळे धर्माचा वापर राजकीय साधन म्हणून करता येणार नाही. भाजप निवडणुकांमध्ये लाभ मिळवण्यासाठी हिंदुत्वाच्या नावावर लोकांना एकत्र करत असून राज्यघटनेतील सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वापासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आज जर इंदिरा गांधी सत्तेत असत्या तर धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या अशा पक्षावर त्यांनी बंदी घातली असती,” असे विधानही गेहलोत यांनी केले.

निवडणूक आयोग भाजपचा एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही संस्थांवर दबाव वाढत असल्याचे म्हटले. न्यायव्यवस्थेसह अनेक घटनात्मक संस्थांवर दबाव असल्याचा दावा करत केंद्र सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आयकर विभागाचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप लोकशाही संस्था आणि मतदानाचा अधिकार कमकुवत करत असल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला. अशा कृतींचा सर्वाधिक फटका समाजातील गरीब घटकांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला “धोकादायक” असे संबोधत गेहलोत यांनी सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय नेत्यांचा निवडकपणे राजकीय वापर करत असल्याचा आरोप केला. “भाजप सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांचे नाव राजकीय फायद्यासाठी वापरतो, मात्र त्यांच्या मूल्यांकडे दुर्लक्ष करतो,” असे ते म्हणाले. लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी पक्षातील ज्येष्ठ मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसेन यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप केला.

राष्ट्रीय राजकारणाबाबत बोलताना गेहलोत म्हणाले की, भविष्यातील राजकारण हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील थेट लढत बनले पाहिजे. राहुल गांधी संसदेत आणि संसदेबाहेरही जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असल्याचे सांगत त्यांनी प्रादेशिक पक्षांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वामागे एकत्र यावे, असे आवाहन केले.