पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठीच बंडखोर खासदारांनी हा मार्ग निवडला, तृणमूल खासदार सौगत रॉय यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) या पक्षात विलीनीकरण करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. पक्षांतरबंदी कायद्यापासून बचाव करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

एएनआयशी बोलताना रॉय म्हणाले की, “ही दुर्दैवी बाब आहे. टीएमसीचे खासदार एका अपरिचित पक्षात गेले आहेत. त्यांनी आपला सन्मान गमावला आहे. एनसीपीआय हा मान्यताप्राप्त पक्षही नाही. तो पश्चिम बंगालमध्ये नोंदणीकृत असला तरी त्याने त्रिपुरामध्ये उमेदवार उभा केला होता. अशा पक्षात विलीन होऊन काय फरक पडणार आहे? पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठीच त्यांनी हा मार्ग निवडला आहे.”

पक्षांतरबंदी कायदा 1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यात आला होता. लोकसभा आणि राज्य विधानमंडळांतील निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पक्षांतर करू नये, यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, बंडखोर खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी रविवारी दावा केला की, लोकसभेतील टीएमसीचे 20 खासदार एनसीपीआयमध्ये विलीन झाले आहेत आणि ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार आहेत.

त्यांनी सांगितले की, या खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली असून संसदेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी करणारे पत्र त्यांना दिले आहे. पक्षाच्या एकूण संख्याबळाच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही त्यांनी केला.

याचवेळी सौगत रॉय यांनी टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरही टीका केली. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी सलग चौकशी करून त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला.

“सीबीआय आणि ईडीकडून त्यांची वारंवार चौकशी करण्यात आली. ते लोकांना काम करू देत नाहीत. विरोधी पक्ष अस्तित्वात राहू नयेत अशी त्यांची भूमिका आहे. हीच भाजपची कार्यपद्धती आहे,” असा आरोप रॉय यांनी केला.