नवी मुंबईत भाजप-शिंदे गटात राडा; कार्यक्रम पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळले गेल्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. लागोपाठ तीन कार्यक्रमांत एकनाथ शिंदे यांना डावलल्यामुळे तीळपापड उडालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांची गाडी वाशी येथील प्रथम संदर्भरुग्णालयासमोर अडवली. त्या वेळी पोलीस, शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. नाव नसल्याचा प्रकार जिव्हारी लागल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या केबिनचा ताबा घेऊन नगर सचिव संघरत्न खिलारे यांनाही घेराव घातला.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वाशी येथे एपीएमसी मार्केटमधून सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. या कार्यक्रम पत्रिकेतही एकनाथ शिंदे यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रम पत्रिकेतही एकनाथ शिंदे यांचे नाव नव्हते.

नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमातही तोच प्रकार घडला. त्यामुळे तीळपापड उडालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाशी येथील महापालिका मुख्यालयासमोर जोरदार गोंधळ घातला. आरोग्य सेवांचे उद्घाटन करण्यासाठी गणेश नाईक त्या ठिकाणी आले असता त्यांची गाडी गेटवरच रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला हटवले.

शिंदे गटाचा विरोध डावलून वन मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सेवांचे उद्घाटन केले. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील याही उपस्थित होत्या. या रुग्णालयात एमआरआय मशीन बसवण्यात आली आहे. एमआरआय सेवेचा शुभारंभही आजपासून झाला आहे.

शिंदे गटाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात नगर सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना घेराव घातला. तसेच महापालिका आयुक्तांच्या दालनाचा बेकायदा ताबा घेतला. मुख्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला.

कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव का नाही, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. हा प्रश्न महापौरांच्या अधिकारक्षेत्रात येतो, त्यांना विचारा, अशी प्रतिक्रिया या वेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केली.