
उष्णतेने त्रस्त झालेले देशभरातील लोकं मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, यावेळी उशीरा आलेल्या मॉन्सूनची वाटचालही धीम्या गतीने सुरू आहे. तसेच आता त्याचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. मॉन्सूनचा वेग मंदावला असला तरी तो हळूहळू पुढे सरकत असून पुढील चार ते पाच दिवसांत तो देशाच्या अनेक ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा सुरू राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
मॉन्सून हळूहळू पुढे सरकत आहे आणि पुढील ५ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडसह काही राज्यांमध्ये पोहोचू शकतो. देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, १५ जून रोजी मोसमी पाऊस आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, झारखंडच्या उर्वरित भागांमध्ये आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये पोहोचला आहे. असे असूनही, वायव्य आणि मध्य हिंदुस्थानातील अनेक भाग अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
पुढील पाच दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारच्या उर्वरित भागांमध्ये आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. सध्याची हवामान परिस्थिती कायम राहिल्यास, या भागांमध्ये लवकरच चांगला पाऊस पडू शकतो.
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये दिवसा उष्णता आणि आर्द्रता अपेक्षित आहे. तथापि, संध्याकाळी सोसाट्याचा वारा, धुळीची वादळे आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. ईशान्येकडील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. काही संवेदनशील भागांमध्ये पाणी साचण्याचा आणि भूस्खलनाचाही धोका आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशात उष्णता आणि उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यामध्ये दमट हवामानामुळे जास्त उकाडा जाणवणार आहे.




























































