मीरा-भाईंदरमध्ये सर्वपक्षीयांचा जनआक्रोश; अत्याचारित पिडितेला न्याय द्या, भाजप नगरसेविका अनिता पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने अवघे मीरा-भाईंदर संतप्त झाले आहे. राजेश चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करून पिडितेला न्याय द्या, या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मीरा रोड येथे जनआक्रोश मोर्चा काढला. हजारो नागरिकांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर त्यात सहभागी झाल्या होत्या. अत्याचार करणारा चव्हाण याला पाठीशी घालणाऱ्या नगरसेविका अनिता पाटील यांनी आपल्या पदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

राजेश चव्हाण याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गोराई येथील हॉटेलमध्ये नेले व तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तिला सिगारेटचे चटके दिले. पिडीत कुटुंबियांनादेखील ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी राजेश याला अटक केली असली तरी नागरिक प्रचंड संतप्त झाले असून दोषींना फाशी द्या आणि आरोपीच्या नगरसेवक बहिणीचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह काँग्रेस, मनसे व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला.

… तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील
पिडीत कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही आणि दोषींना त्यांच्या कर्माची शिक्षा होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश राज पुरोहित, मनसेचे संदीप राणे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.