
वारंवार होणाऱ्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी समर्थन दिलं. सामाजिक जबाबदारी असलेल्या सर्व देशवासियांनी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “सामाजिक जबाबदारी असलेल्या प्रत्येकाने विद्यार्थ्यांसोबत उभे राहिले पाहिजे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी अनेक पालक कर्ज काढत आहेत.”
हा प्रश्न केवळ एखाद्या एक-दोन घटनांपुरता मर्यादित नसून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर आणि खोलवर रुजलेल्या समस्येचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. “ही एक खोलवरची व्यवस्थात्मक समस्या आहे आणि आपण सर्वांनी मिळून तिचे निराकरण केले पाहिजे. पेपरफुटी हा एकदाच घडणारा प्रकार नाही. ही समस्या सातत्याने समोर येत आहे आणि यामध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचा अभ्यास, मेहनत आणि भवितव्य पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे धोक्यात येत असल्याचे सांगत प्रियंका गांधी यांनी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १७ जूनपासून देशभर विद्यार्थी अधिवेशनांची मालिका सुरू करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात कोटा येथून होणार असून परीक्षा घोटाळे, पेपरफुटी आणि युवकांशी संबंधित विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे.



























































