
हिंदुस्थानचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये सोमवारी जोरदार राडा पाहायला मिळाला होता. श्रीलंकेच्या खेळाडूने टिप्पणी केल्यावर वैभवने थेट त्याला जोरदार धक्का दिला आणि मैदानात राडा झाला. याप्रकरणी आता श्रीलंकेच्या खेळाडूंनी वैभवची माफी मागितल्याचे समोर येत आहे.
प्रकरण आहे तरी काय…
हिंदुस्थान ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात सोमवारी झालेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. हिंदुस्थानला सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. यावेळी वैभव सूर्यवंशी फलंदाजीला होता, पण त्याला संघाला सामना जिंकवता आला नाही. वैभव पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलंबगेने त्याला डिवचले. त्यानंतर वैभवने त्याला जोरदार धक्का दिला
विशेन वैभवला नेमकं काय म्हणाला…
वैभव जेव्हा सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला आला तेव्हापासून त्याला विशेन हा डिवचत होता. हिंदुस्थानने सामना गमावला तेव्हा वैभव परतत होता. त्यावेळी विशेन त्याला म्हणाला की, ‘तू घरी जा. ही काही आयपीएल नाही.’ त्यानंतर वैभव हा त्याच्यावर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले.
विशेनचा माफीनामा
मैदानात झालेली धक्काबुक्की श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी थांबवली. त्यानंतर आपल्या पॅव्हेलियनमध्ये आला आणि त्यानंतर श्रीलंकेच्या विशेनला आपली चूक समजली. त्यामुळे विशेन हा श्रीलंकेच्या काही खेळाडूंबरोबर वैभवला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या विशेनने वैभवची माफी मागितल्याचे वृत्त समोर आले आहे.
वैभवचंही चुकलंच
श्रीलंकेच्या खेळाडूने टिप्पणी केल्यावर वैभवने लगेच त्याला धक्का मारला. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. भारतीय क्रिकेटमध्ये वैभवची तुलना आता दिग्गजांशी केली जाते, पण या दिग्गजांनी कधीही मैदानात असे प्रकार केल्याचे पाहायला मिळाले नाही. उलटपक्षी ते नेहमी शांत राहिले. त्यामुळेच वैभवला जर त्यांच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर त्याला आतापासूनच संयम बाळगावा लागेल.



























































