
‘लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार आहे’, अशा अत्यंत तिखट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त केला असून, विरोधकांचे आमदार-खासदार फोडण्याच्या या प्रक्रियेला त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ ऐवजी ‘ऑपरेशन बाजार’ असे संबोधले आहे.
‘एका खासदाराचा रेट ८५ कोटी?’
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षांतरासाठी होणाऱ्या कथित आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले, ‘एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी रुपये आहे का? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडे नेमके पैसे येतात कुठून?’ शिवसेना, राष्ट्रवादी, आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांमधील फुटीचा संदर्भ देत त्यांनी, ‘देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस जनताच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही’, असा इशाराही दिला. हा बाजार नेमका लायकीचा, माणसांचा की विचारांचा, हे आता जनताच ठरवेल, असेही ते म्हणाले.
जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

सध्याच्या राजकीय गोंधळात सर्वसामान्यांच्या गंभीर प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याबद्दल रोहित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवताना त्यांनी खालील मुद्द्यांकडे लक्ष वेधले. आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
























































