नॉर्वेच्या विजयात हालांदची चमक, सेनेगलवरील रोमहर्षक विजयासह गाठली बाद फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोलमशीन आर्ंलग हालांदने सलग दुसऱ्या सामन्यात दोन गोल झळकावत नॉर्वेला फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीत पोहोचवले. सेनेगलविरुद्धच्या रोमांचक लढतीत नॉर्वेने 3-2 असा विजय मिळवत अखेरच्या 32 संघांमध्ये स्थान निश्चित केले, तर सेनेगलचे आव्हान अद्याप जिवंत असले तरी त्यांची स्थिती बिकट झाली आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच नॉर्वेने आक्रमक खेळ करत सेनेगलवर दबाव निर्माण केला. ख्रिस्तोफर आयरच्या हेडरवर गोलरक्षक एडवर्ड मेंडीने अप्रतिम बचाव केला. कर्णधार मार्टिन ओडेगार्डलाही सुरुवातीला गोलची संधी मिळाली, मात्र ती वाया गेली. पहिल्या हाफच्या अखेरीस सेनेगलच्या बचावातील मोठय़ा चुकीचा नॉर्वेने फायदा उचलला. कर्णधार कालीदू कुलिबालीच्या चुकीमुळे चेंडू मार्कस होल्मग्रेन पेडरसनकडे आला आणि त्याने जोरदार फटका मारत नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर अवघ्या तीन मिनिटांत नॉर्वेने आणखी एक घाव घातला. ओडेगार्डच्या अचूक पासवर एार्ंलग हालांदने वेगवान धाव घेत गोलरक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडू जाळ्यात धाडला आणि आघाडी 2-0 अशी वाढवली.

मात्र सेनेगलने हार मानली नाही. सादिओ मानेच्या चतुर खेळीवर इस्माईला सार याने गोल करत सामना 2-1 असा केला. सेनेगल पुनरागमनाच्या आशा बाळगत असतानाच पुन्हा एकदा कुलिबालीची चूक महागात पडली. बचावफळीला चकवत हालांदने पॅट्रिक बर्गच्या क्रॉसवर अप्रतिम व्हॉली मारत चेंडू क्रॉसबारला लागून जाळ्यात पाठवला आणि नॉर्वेची आघाडी 3-1 अशी केली.

सामन्याच्या अखेरीस इस्माईला सार याने दुसरा गोल करत सेनेगलला पुन्हा लढतीत आणले. त्यामुळे शेवटची काही मिनिटे अत्यंत तणावपूर्ण ठरली, मात्र नॉर्वेच्या बचावपटूंनी आघाडी कायम राखत महत्त्वाचा विजय आपल्या नावावर केला.