
राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव वाचताना केलेल्या चुकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून शोकप्रस्ताव वाचनावर आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, ‘ हे नार्वेकर नसून ‘नॉर्वेकर’ आहेत का याचा शोध घ्यायला पाहिजे’, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच ‘ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिवाय विधानसभा अध्यक्षपदाची घटनात्मक नोकरी कुणी दिली? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केले पाहिजे’, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ‘हा मराठीचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान आहे’, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, हे अत्यंत गंभीर आहे. हे नार्वेकर आहेत की युरोपातील एक देश आहे नॉर्वे तिथले ‘नॉर्वेकर’ तर नाहीत ना, याचा शोध घ्यावा लागेल. असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांनासुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती आहे असं मुख्यमंत्री सांगतात. पण त्यांनी नेमलेल्या विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही, मराठीचे धिंडवडे काढतात, पद्मविभूषण आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे बोलले की ते भेळचा कागद वाचत होते का ते बरोबर आहे, असंही संजय राऊत म्हणाले, ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाचे ठोके मराठी नाहीत, असा हा माणूस तिथे बसवला गेला. मराठीचा अपमान केल्याबद्दल ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं गेलं पाहिजे, अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी आपली मागणी समोर ठेवली.































































