50 कोटींचा माज, सत्तेची मस्ती! संजय दिना यांची पत्रकारांना ठार मारण्याची धमकी! पत्रकार संघटनांकडून निषेध, बहिष्कार ठाण्यात निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी धमकावले होते. याबाबत आज टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारांनी  प्रतिक्रिया विचारली असता संजय दिना भडकले. पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. विविध पत्रकार संघटनांनी याचा निषेध करत कारवाईची मागणी केली, तर ही अरेरावी म्हणजे सत्तेची मस्ती आणि 50 कोटींचा माज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून आणि समाजमाध्यमांतून उमटल्या.

संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना धमकावल्याबद्दल पोलीस आयुक्तांकडे तक्रार झाली आहे. त्यासंदर्भात टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारांनी पाटील यांचे भांडुपमधील घर गाठून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर न देता उलट पत्रकारांनाच धमकी दिली. पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर संजय दिना पत्रकारांवर भडकले.

पत्रकार परिषदेवर बहिष्कार

फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती. त्यासाठी टीव्ही वाहिन्यांचे पत्रकार शिंदे गटाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी स्पष्ट शब्दांत संजय पाटील यांच्यावर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले.

पत्रकार संघटनांकडून निषेध आणि कारवाईची मागणी

शिंदे गटात सामील झालेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा पत्रकार संघटनांनी निषेध करत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना संयमाने आणि जबाबदारीने उत्तरे देणे अपेक्षित असते. दमदाटीची भाषा पत्रकारांना उद्देशून वापरणे  लोकप्रतिनिधींना अजिबात शोभणारे नाही. खासदार संजय पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केली आहे.

पोलीस संरक्षणात एका गावगुंडाला शोभेल अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या संजय पाटील यांच्या कृतीचा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाने निषेध केला आहे. याप्रकरणी त्यांनी तत्काळ माफी मागावी. ते माफी मागणार नसतील तर त्यांच्या पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे यांनी केली आहे.

फडणवीसांचा संताप, शिंदेंची सारवासारव

पत्रकारांना धमकी देण्याच्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. गेल्या वर्षभरात शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करून देत फडणवीस यांनी पत्रकारांबाबत अशा प्रकारची भाषा खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच संजय दिना पाटील यांना कठोर शब्दांत समज देण्याची सूचना केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. खासदार संजय पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना माध्यमांची दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगत या प्रकरणावर सारवासारव केली.  दरम्यान, संजय दिना यांनी रात्री एक व्हिडिओ जारी करून पत्रकारांची माफी मागितली.

संजय दिना पाटील यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून आज डोंबिवली, दिवा, कळवा येथील शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जावदवाड यांना शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

कायदेशीर कारवाई करा

संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी मुंब्रा पोलिसांकडे केली आहे.

भिवंडीत निषेध

भिवंडीतील पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलन केले. त्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांची भेट घेऊन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

सांगा कमिशनरला… काय करायचं ते करा!

‘कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. पोलिसांसमोर सांगतोय. काय कम्प्लेंट करायची ती करा!’ अशी अरेरावी संजय दिना यांनी केली.