
ऑर्पेस्ट्रा आणि लाइव्ह म्युझिकच्या परवानग्यांचा गैरवापर करून बारमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱया छमछमला आता आता चाप लागणार आहे. डान्स बार सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत करण्यात आले. या विधेयकामुळे बारमधील ऑर्पेस्ट्राही डान्स बार बंदी कायद्याच्या कक्षेत आला असून अश्लील नृत्यांना आळा घालण्यासाठी या सुधारणा विधेयकात कडक नियमावलीचा समावेश आहे.
आतापर्यंत ऑर्पेस्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम’ अंतर्गत परवानग्या दिल्या जात होत्या, ज्यांचा गैरवापर करून डान्स बार चालवले जात आहेत, असा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा आरोप होता. आता अशा सर्व परवानग्या थेट ‘डान्स बार कायद्याच्या’ कक्षेत येणार आहेत. हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम विधेयक गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत मांडले.
तीन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास परवानाच कायमचा रद्द
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अश्लील नृत्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱया बार मालक आणि चालकांवर कठोर शिक्षेची व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तीन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास थेट परवानाच कायमचा रद्द केला जाऊ शकतो.

































































