लुटमारीचा हिशेब द्या! काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरातून राज्यव्यापी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह सुरू केला. राम मंदिरात झालेल्या लुटमारीचा हिशेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गाऊन सत्याग्रहास सुरुवात केली. त्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हणण्यात आली. श्रीराम मंदिरातील देणगी लुटीचा यावेळी निषेध करण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर प्रत्येक जिह्यात भजन आंदोलन केले जाईल, असे सपकाळ यांनी सांगितले.

आंदोलन होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा

‘नाशिकमधील काँग्रेसचे आंदोलन होऊच नये म्हणून सरकारने ढगफुटीची अफवा पसरवली. हवामान विभागाचा इशारा नसतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटे सांगितले, असा आरोप सपकाळ यांनी केला.