
आम्ही हार मानणार नाही हे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने तमाम जगाला आज दाखवून दिले. पहिल्या सत्रात 0-1 पिछाडी, 70 मिनिटांपर्यंत 0-2 पिछाडी आणि त्यानंतर जो अर्जेंटिनाचा रणगाडा धावला त्याला विजयाची झालर होती. सुरुवातीला अर्जेंटिना हा सामना हरेल, असे वाटत होते. पण अखेरच्या जवळपास 20 मिनिटांत अर्जेंटिनाने असा काही गेम फिरवला की त्यांनी थेट विजयाचे तोरणच बांधले. फिनिक्स भरारी घेत अर्जेंटिनाने पिछाडीवरून 3-2 असा सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
सामन्याच्या सुरुवातीला मेस्सीला गोल करण्याच्या दोन संधी होत्या, पण त्या दोन्हीही त्याने गमावल्या. पण दुसरीकडे इजिप्तच्या यासिर इब्रहीममे गोल करत संघाचे खाते उघडले. अर्जेंटिना त्यानंतर गोल करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण पहिल्या सत्रात ते पिछाडीवरच राहीले. दुसऱया सत्रात 67 व्या मिनिटाला मोस्तफा झिकोने इजिप्तसाठी दुसरा गोल केला. इजिप्त आता विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला होता. पण कडवट फुटबॉल खेळाडूंचा भरणा असलेल्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी हार मानली नाही. ख्रिस्तियन रोमेरोने सामन्याच्या 79 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला आणि आशेचा किरण दिसला.
Argentina pull it back late to secure their spot in the last eight! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 7, 2026
मेस्सी आतापर्यंत कुठेच नव्हता, पण आपण महान का आहोत, याची प्रचीती त्याने यावेळी दिली. अर्जेंटिना इजिप्तच्या गोलपोस्टवर वारंवार हल्ले करत होती, पण त्यांन यश मिळत नव्हते. पण मेस्सी तिथे आला आणि फक्त एका फटक्याने त्याने गोल केला. डाव्या पायाने वीज कडाडावी तसा चेंडू गोलपोस्टमध्ये गेला आणि 83 व्या मिनिटाला अर्जेंटिनाने 2-2 अशी बरोबरी साधली. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची ही चिन्हं होती, पण अर्जेंटिना शांत बसणारी नव्हती. 90 +3 मिनिटाला इंझो फर्नांडेझने दाखवत जो गोल केला तो संघाला पुढच्या फेरीत घेऊन गेला.





























































