कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न, झाडावर चढून आंदोलन, सातबारे भिरकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन केले. शेतकऱयांना घेऊन त्यांनी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते विधान भवनाच्या झाडावर चढून त्यांनी विधान भवनात सातबाऱयाच्या प्रती भिरकावल्या. तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे शासन, प्रशासन हादरले. विधान भवनात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. पोलिसांनी तुपकर यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही तुपकर आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. काही क्षणांतच त्यांनी शेतकऱयांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या. या वेळी ‘शेतकऱयांच्या घामाची किंमत द्या’, ‘सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या’, ‘सरकारने दिलेला शब्द पाळा’ अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर बंदोबस्तासाठी तैनात शेकडो पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना गराडा घालत ताब्यात घेतले. तुपकर यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आक्रमक आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधान भवनाच्या दारात पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शेतकरी प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय केला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अनेक दिवस उलटूनही बैठक न झाल्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागल्याचे तुपकर यांनी सांगितले.