
केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्राrनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि परिचारिकांना केलेल्या बेदम मारहाणीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी 20 जुलै रोजी राज्यभर 24 तासांचा वैद्यकीय कामबंद आंदोलनाचा निर्णय जाहीर केला आहे. या दिवशी 24 तास ओपीडी बंद राहणार आहे. शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस निर्णय न घेतल्यास 9 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.
आयएमए महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत शास्त्राrनगर रुग्णालयातील स्त्राrरोगतज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके तसेच नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱयांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. रुग्णसेवा बजावत असताना डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांवर होणारी हिंसा ही केवळ एका व्यक्तीवरील नव्हे तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील हल्ला आहे. राजकीय दबाव झुगारून शासनाने शास्त्राrनगर रुग्णालयातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध म्हणून 20 जुलै रोजी राज्यातील आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि राज्य खजिनदार डॉ. अमोल गीते यांनी दिली. डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचारविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णयही बैठकीत एकमताने घेण्यात आला.
या वैद्यकीय सेवा बंद राहणार
‘आयएमए’च्या निर्णयानुसार 20 जुलै रोजी राज्यभरातील सर्व नियमित ओपीडी सेवा, शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद राहतील. मात्र आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनात आधुनिक वैद्यकासह आयुर्वेद, होमिओपॅथी, विविध वैद्यकीय संघटना, परिचारिका संघटना, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.





























































